आनंदाची गुढी
आनंदाची गुढी फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो. पण तो नुसता येत नाही. आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो. तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता. या चैत्र महिन्यात किती तरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो. वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं. वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही. या वसंतात सृष्टी गंधवती होते. झाडं आपली जुनी वस्त्रं टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात. तांबूस कोवळी, पोपटी, हिरवीकंच पाने जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात. निरनिराळी फूल फुलून आलेली असतात. गुलाब, मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात. आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर, वातावरण धुंद करीत असतो. कोकिळेचा पंचम स्वर आसमंतात निनादत असतो. अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो. गुढीपाडवा हा सण देशाच्या सगळ्या भागात साजरा होतो. दक्षिण भा...