आनंदाची गुढी

 आनंदाची गुढी 


      फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो. पण तो नुसता येत नाही. आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो. तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता. या चैत्र महिन्यात किती तरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो. वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं. वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही. या वसंतात सृष्टी गंधवती होते. झाडं आपली जुनी वस्त्रं टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात. तांबूस कोवळी, पोपटी, हिरवीकंच पाने जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात. निरनिराळी फूल फुलून आलेली असतात. गुलाब, मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात. आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर, वातावरण धुंद करीत असतो. कोकिळेचा पंचम स्वर आसमंतात निनादत असतो. अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो. 

     गुढीपाडवा हा सण देशाच्या सगळ्या भागात साजरा होतो. दक्षिण भारतात त्याला युगादी किंवा उगादी असे म्हटले जाते. काही ठिकाणी पाडो किंवा पाडवा असेही म्हटले जाते. गुढीपाडवा हा सण आजचा नाही. असे म्हणतात की ब्रह्माने याच दिवशी सृष्टी निर्मिली. गुढीपाडव्याचे संदर्भ हजारो वर्षांपासूनच्या वाङ्मयात आपल्याला मिळतात. अगदी रामायणापासून त्यांची सुरुवात होते. गुढी या शब्दाचा अर्थ तामिळ भाषेत लाकूड किंवा काठी असा होत असला आणि प्राचीन मराठी वाङ्मयात गुढी या शब्दाचा झोपडी, कुटी वगैरे असा असला तरी खरं म्हणजे गुढी हा शब्दच आनंदासाठी आला आहे. एखादं मोठं काम करणं, शत्रूवर विजय प्राप्त करणं, हाती घेतलेल्या कामात यश मिळणं या सगळ्या गोष्टींसाठी गुढी उभारणे असा वाक्प्रयोग केला जायचा. 

      गुढी हे मानवी देहाचंही प्रतीक आहे. आपल्या पाठीतून जाणारा मेरुदंड म्हणजे वेळू किंवा काठी. त्यावर आपले डोके म्हणजे घट. गुढीवरचे रेशमी वस्त्र म्हणजे जणू मानवी देह. त्यावर असणारी कडुलिंबाची आणि आंब्याची पाने म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखाचे प्रतीक. गुढीला घातलेला साखरेचा हार किंवा गाठी म्हणजे परमेश्वराचे प्रतीक. जेव्हा आपण आपली सुखदुःखे त्या परमेश्वररूपी साखरेच्या गोड चवीबरोबर मिसळून घेतो, तेव्हा जीवनही गोड, अमृतमय होते. आरोग्याच्या दृष्टीनेही कडूलिंबाच्या पानांचे महत्व आहे. लिंबाची पाने चवीला कडू असली तरी गुणधर्माने थंड आहेत. पुढे सुरु होणाऱ्या कडक उन्हाळ्याला तोंड देता यावे म्हणून कडुलिंबाच्या पानांची चटणी गूळ, मीठ, मिरपूड इ. घालून खातात. 

       संत एकनाथांच्या रचनांमध्ये तर अनेकवेळा गुढीचा उल्लेख आपल्याला आढळतो. जेव्हा आपण काहीतरी विशेष अशी गोष्ट साध्य करतो, तेव्हा विविध रूपांमध्ये गुढीचे प्रतीक त्यांना भासमान होते. मग ती गुढी हर्षाची, ज्ञातेपणाची, भक्तीची, यशाची, रामराज्याची रोकडी, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची अशी विविध प्रकारची आहे. 

     गुढी ही उंच उभारली जाते. ती आशाअपेक्षांचे प्रतीक असते. ती जणू आपल्याला सांगते, तुमचे ध्येय, आशा, अपेक्षा अशाच उंच असू द्या. त्यांना मर्यादा घालू नका. स्काय इज द लिमिट ! आपल्या नवीन वर्षाचा आरंभ या सणाने होतो म्हणून वर्षारंभीचे उत्तम, उदात्त असे संकल्प मनाशी योजा आणि वर्षभरात आपल्या प्रयत्नांनी ते तडीस न्या.

     हाच गुढीपाडव्याचा संदेश आहे. कवयित्री बहिणाबाई फार सुंदर संदेश आपल्याला आपल्या कवितेतून देतात. त्या म्हणतात - 

       गुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी 

       नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली अढी 

       गेली साली गेली आढी, आता पाडवा पाडवा 

       तुम्ही येरयेरांवरी लोभ वाढवा वाढवा.

Comments

Popular posts from this blog

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा

सारे जहाँ से अच्छा...