ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा

 ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा

        मुळात पौर्णिमा हा शब्दच किती सुंदर..! पौर्णिमा म्हटलं की आकाशात रात्री तेजानं प्रकाशमान होणारं पूर्ण चंद्रबिंब आपल्यासमोर येतं . त्या प्रकाशात मनाला शांतता देणारी एक प्रकारची शीतलता असते. ' चंद्र व्हा हो पांडुरंगा , मन करा थोर, पौर्णिमेच्या चांदण्याला भुकेला चकोर...' जसा चंद्राच्या चांदण्याला चकोर भुकेला असतो, तसाच सद्गुरूंच्या कृपेसाठी शिष्यही भुकेला असतो. सद्गुरू मग आपल्या शिष्याला ज्ञानामृत पाजण्यासाठी चंद्र होतात. पांडुरंग तर ते प्रत्यक्ष असतातच. आपल्या संस्कृतीत गुरूंना देव म्हणण्याची पद्धत आहे. नुसते ' गुरु ' न म्हणता आपण आदराने त्यांना गुरुदेव म्हणतो, आचार्यदेव म्हणतो. एवढा गुरूचा महिमा आहे. संत कबीर तर गुरूंना देवापेक्षाही महान मानतात. ते म्हणतात गुरु गोविंद दोनो खडे, काके लागू पाय बलिहारी गुरु आपकी, जो गोविंद दिजो बताय. एकाच वेळेला समोर सद्गुरू आणि परमेश्वर असे दोघेही उभे राहिले, तर मी आधी सद्गुरुंच्या पायी लागेन. कारण परमेश्वराचे दर्शन घडवणारे सद्गुरू आहेत. असे म्हणतात की एखादया वेळी देव कोपला तर सद्गुरू सांभाळून घेतात, पण सद्गुरू कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही, एवढी सद्गुरूंची शक्ती आहे. गुरु म्हणजे ज्ञानाची पौर्णिमा. गुरु या शब्दात दोन अक्षरे आहेत. गु आणि रु. गु म्हणजे अंध:कार आणि रु म्हणजे प्रकाश. जो आपला अज्ञानाचा अंध:कार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, आणि त्या प्रकाशात मग आपली पुढची परमार्थाची वाटचाल सुलभतेने होते, तो गुरु. आपल्याला शाळा, महाविद्यालयात जे ज्ञानदान करतात ते आणि पारमार्थिक मार्गावर वाटचाल करत असताना जे मार्गदर्शन करतात ते, असे दोघेही गुरूच. आईवडील आपले पहिले गुरु, दुसरे म्हणजे आपल्याला ज्ञानदान करणारे आपले शिक्षक आणि तिसरे म्हणजे अध्यात्म मार्गात दिशा दाखवणारे सदगुरु. आषाढ शुद्ध पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. व्यासांना आद्य गुरु म्हटले जाते. त्यांनी चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांची पुनर्रचना केली असे म्हटले जाते. व्यासांनी ज्याला स्पर्श केला नाही असा एकही विषय नाही. महाभारतासारख्या महाकाव्यावरून व्यासांच्या अलौकिक प्रतिभेचे आपल्याला दर्शन होते. नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, मानसशास्त्र, जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणारे गीतेसारखे अलौकिक तत्वज्ञान फक्त महाभारतातच आपल्याला सापडते. गुरुपौर्णिमेच्या प्रथेचे उल्लेख रामायण, महाभारत काळापासून सापडतात. आजच्या दिवशी विविध धर्म, संप्रदाय, शिष्य इ सगळे गुरुपौर्णिमा साजरी करून आपल्या गुरुंप्रती आदर आणि निष्ठा व्यक्त करतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही आपले आदर्श. प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार असलेल्या या दोघांनी गुरूंच्या आश्रमात जाऊन त्यांची सेवा केली. ते जरी प्रत्यक्ष परब्रह्म होते, तरी गुरूशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले. गुरूमुळे शिष्याला ज्ञान मिळते तसेच आदर्श शिष्यामुळे गुरूला महानता मिळते, तशी या दोघांच्या गुरूंना मिळाली. ते धन्य झाले झाले आणि त्यांचे गुरुही. श्रीकृष्ण आणि बलराम संदिपनींच्या आश्रमात जाण्यासाठी मथुरेहून उज्जैनला अक्षरशः पायी चालत गेले. वास्तविक ते राजपुत्र होते. ते त्या काळात रथातून, सैन्याची मदत घेत आश्रमात जाऊ शकले असते. पण तसे करणे त्या काळातील संकेतांविरुद्ध होते. शिवाय गुरूंसमोर नम्र होऊन जायचे असते. पूर्ण शरणागत व्हायचे असते. आश्रमात गेल्यानंतर सुद्धा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सामान्य शिष्यांप्रमाणे आश्रमातील सगळी कामे केली. गुरूंसमोर आपल्या सत्तेचा दिमाख, मिजास, तोरा दाखवायचा नसतो. हा संकेत त्या काळात पाळला जात होता. म्हणून राजादेखील गुरूंसमोर नम्र होत असे. त्यांच्या शब्दांचा आदर करीत असे. पण पुढील काळात हे संकेत पायदळी तुडवले गेले हा भाग वेगळा. त्याची चर्चा इथे आज आपल्याला करायची नाही. शिवाजी महाराजांचे उदाहरण या ठिकाणी मला आठवते आहे. समर्थ रामदास शिवथरघळीत असताना राजे त्यांच्या भेटीसाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी तांबूल म्हणजे विडा खाणे सोडले होते. समर्थाना हे माहित होते. त्यांनी निघताना शिवरायांच्या हातावर तांबूल ठेवला. शिवरायांनी कुठलाही विचार न करता तो लागलीच भक्षण केला. समर्थांनी त्यांना सहज विचारले, ' राजे, आपण तांबूल खाणे सोडले होते असे ऐकले होते. ' शिवराय तात्काळ उत्तरले, ' स्वामी, आम्ही तांबूल भक्षण केलाच नाही. जे काही भक्षण केले, तो आपला प्रसाद समजूनच भक्षण केला. ' अशी असावी लागते सद्गुरूंवर निष्ठा. असं म्हणतात की तुम्हाला गुरु शोधण्याची गरज नसते. एकदा शिष्य म्हणून तुमची पात्रता झाली की तुमचे गुरु स्वतःहून तुम्हाला शोधत येतात. गुरूंचे ज्ञान, तन, मन आणि धन सारे काही शिष्यासाठीच असते. गुरुचे शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते. शिष्याकडून त्याला कोणतीच अपेक्षा नसते. शिष्याची पात्रता पाहून गुरु ज्ञान देतात. गुरूंच्या शिकवण्याच्या अनेक पद्धती असतात. ते आपल्या उक्तीतून आणि कृतीतून तर शिकवतातच, पण आपल्या मौनातूनही शिकवतात. शिष्याला ते मंत्र देतात. तो गुरुमंत्र असतो. त्यात त्यांचे सामर्थ्य असते. एकदा अनुग्रह घेतल्यानंतर शिष्याची सगळी जबाबदारी गुरु घेतात. ते त्याचा धरलेला हात कधीही सोडत नाही. त्याच्या साधनेच्या मागे ते उभे असतात. ते त्याच्याकडून साधना करवून घेतात. म्हणून जेव्हा शिष्य साधना करतो, तेव्हा त्याच्या अहंकाराला कुठेही वाव नसतो. कारण सद्गुरूच आपल्याकडून सर्व करवून घेतात ही भावना त्यामागे असते. सद्गुरू म्हणजे फक्त देह असे जो समजतो, त्याला सद्गुरू कळलेच नाही असे म्हणावे लागते. सद्गुरू हे देहाच्या पलीकडे कार्यरत असणारा एक चैतन्यस्त्रोत असतो. ते देहात असताना तर कार्य करतातच, पण त्यांच्या अवतार समाप्तीनंतर सुद्धा कार्यरत असतात. या तत्वाचा अनुभव आपली जर गुरूंवर श्रद्धा असेल तर आजही हजारो लोकांना येतो. श्री स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज आदी संतांच्या कृपेची प्रचिती आजही भाविकांना येते. आपले गुरु कोणतेही असो, ते श्रेष्ठच असतात. कारण गुरुतत्व एकच आहे. मला स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकल्या की इतर गुरूंपेक्षा ते श्रेष्ठ वाटू लागतात. गोंदवलेकर महाराजांबद्दल ऐकले की ते श्रेष्ठ वाटू लागतात. गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज आदींबाबतही असेच होते. पण माझे मन जर असे हेलकावे खात असेल, तर ते माझी माझ्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा नाही याचे द्योतक आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंना आणि परमेश्वरालाही प्रार्थना करू या की मला माझ्या गुरुप्रती पूर्ण निष्ठा, श्रद्धा दे. समर्पण भावना माझ्यात येऊ दे. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करण्याचे सामर्थ्य मला दे. त्यांनी सांगितलेली साधना माझ्याकडून होऊ दे. असे झाले म्हणजे मी खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली असे होईल. ' माझी देवपूजा, पाय तुझे गुरुराजा. ' गुरुविण नाही दुजा आधाररडता-पडता कोठे अडतातोच नेतसे पारगुरुविण नाही दुजा आधार म्हणून सद्गुरूंना शरण जाऊ या. 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

सारे जहाँ से अच्छा...