शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण
शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात
पदार्पण
श्री
त्रिविक्रम देव, त्रिभुवनाची जननी| तो हा चक्रपाणी शेंदुर्णीत||
सोन नदीच्या काठावर सुंदर पवित्र मंगल असे शेंदुर्णी गांव वसलेले आहे. त्रिविक्रम महाराजांच्या या प्रति पंढरपूरात अनेक साधु संत कडोबा महाराजांसारखे होऊन गेलेत. त्याचप्रमाणे सहकार महर्षी आप्पासाहेब रघुनाथराव गरूड व काका साहेब साने यासारखी सर्व क्षेत्रातील श्रेष्ठ मंडळी होऊन गेलीत. याच पुण्यकर्म भूमीमध्ये आचार्य बापूसो. गजाननराव गरुडांचा जन्म ३ ऑक्टोंबर १९२९ साली
![]() |
आचार्य बापूसो. गजाननराव गरुड |
जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या
गावी झाला. त्यांनी आपल्या स्वतःच्या अलौकीक कर्तृत्वाने महात्मा फुले, डॉ.
बाबासाहेब आंबडेकर व राजर्षी शाहू महाराज, विठठ्ल रामजी शिंदे, सावित्रीबाई
फुले रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा
वारसा चालविण्याचा प्रयत्न केला.
बापूचे वडील स्व. आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरूड हे जळगांव जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले प्रेसिडेंट होते व सलग १५ वर्षे अध्यक्ष असलेले व शेंदुर्णी को ऑप फ्रुटसेल सोसा. चे आजन्म अध्यक्ष असलेले एक बडे वजनदार प्रस्थ होते. आई कै. भगीरथीबाई रघुनाथराव गरूड एखादया मराठमोळ्या स्त्रीला शोभणारी दणकट देहयष्टी, नऊवारी पातळ, रूंद कपाळयष्टी व त्यावर शोभून दिसणारे मोठे कुंकू अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होते. शिस्तीच्या भोक्त्या होत्या. त्यांनी आपले कार्य व कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सरपंचपदाचा मान त्यांना मिळाला. अशा थोर मातापित्यांचा वारसा घेऊन बापूसाहेब यांनी सहकार व शिक्षण क्षेत्रात वाटचाल सुरू केली. स्वातंत्र्याच्या महामंथनाने रसरसलेली ही ज्ञानदानाची गंगोत्री जळगांव जिल्ह्यात संथपणे व सातत्याने वाहत आहे.
![]() |
बापूची आई |
![]() |
बापूचे वडील |
![]() |
बापूचे गुरु सद्गुरू हरिप्रसाद महाराज |
बापू म्हणजे खान्देशचे कर्मवीर भाऊराव पाटीलच, प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान हे अमुल्य असते तसेच हरीप्रसाद महाराज हे त्यांचे गुरु. बापूंनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेने तळागाळातील मुलांना शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही.असे त्यांना उमगले. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या (विद्ये विना मती गेली, मती विना वित्त गेले, वित्त विना नीती गेली, नीती विना गती गेली एवढे अनर्थ एका अविद्येने केले) या उक्तीची जाण ठेवून त्यांनी शेतकऱ्यांच्या, कामकऱ्यांच्या मुलांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न केला. बापू हे कर्मयोगी होते, ज्ञानयोगी होते, एक तपस्वी होते. त्यांनी तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाच्या सर्वांगीण प्रसाराचा अव्याहत ध्यास घेतलेला होता. त्यासाठी त्यांनी जिवाची, शरीराची पर्वा केली नाही. बापूसाहेबांचे करारी व्यक्तिमत्व, हसरा चेहरा आणि समोरच्या व्यक्तिला आपलेसे करण्याची शैली यामुळे हा भाषाप्रभू जनमानसात अत्यंत लोकप्रिय व्यक्ती ठरली होती. त्याचे वत्कृत्व ऐकण्याचा प्रसंग म्हणजे श्रोत्यांच्या दृष्टिने एक प्रकारे ज्ञानाची पर्वणीच! सद्गुरु हरिप्रसाद महाराज आणि आदिशक्ती महाकाली जगदंबा यांचे नामस्मरण केल्या३शिवाय बापू बोलत नसत. ते संस्थेच्या अडीअडचणीच्या वेळी म्हणत, "हा आपला शैक्षणिक रथ सद्गुरु हरिप्रसाद महाराज आणि जगदंबा भवानी यांच्या कृपाप्रसादानेच पुढे रेटला जातो आहे. मी मात्र नाममात्र आहे. आपल्याला चिंता करण्याची गरज नाही पांडवांचा सारथी भगवान श्रीकृष्ण होते. आपले सारथी सद्गुरु हरिप्रसाद महाराज आणि भगवती जगदंबा यांची कृपा छत्र आहे.
"सद्गुरु
सारखा असता पाठीराखा ! इतरांचा लेखा कोण करी !!"
बापूसाहेब
म्हणजे देवाचे आवडते भक्त ! परमेश्वराने त्यांना भलीमोठी बुद्धी प्रदान केलेली
होती, कधी कधी ते वर्गात येत मुलांना वर्ग सुरू असलेल्या फिरवून पाठावर प्रश्न विचारीत.
एखादे वेळी वर्गात आवडीने शिकवीतही.
त्यांचे शिकवणे तासन् तास चालत.भविष्य शास्त्रात बापूसाहेबांचा गाढा अभ्यास होता.
संस्कृत भाषा त्यांना चांगल्या प्रकारे मुखोद्गत होती.संत रामदास स्वामी त्यांच्या
एकांतवासा विषयी म्हणत, ' दास डोंगरी राहतो, चिंता
जगाची वाहतो' बापूसाहेब कुठेही असले तरी वस्तीगृहे,शाळा, मुले, शिक्षक
यांचीच नेहमी काळजी वाहत.
'अन्न
दानम् महा दानम् । विद्या दानम्
महत्तमम्' ।।
न अन्येयक्षणिका
तृप्ती । यावत जिवतू विद्यया ||
या परीपूर्ण उक्तीचा उपयोग करणाऱ्या शेंदुर्णी संस्थेचा विस्तार जळगाव जिल्ह्यात वाढविला. काण्या - कोपऱ्यातील दिन - दलित मागास होतकरू
विद्यार्थ्यांना ज्ञान दानाची गंगोत्री त्यांच्या घरोघरी पोहचविणाऱ्या या संस्थेचा
जन्मच मुळ स्वातंत्र्य प्राप्ती पुर्वी झाला. संस्थेचा उगम मुळ क्रांतीतुन झाला
असुन देश पारतंत्र्यात असतांना ब्रिटीशांची सत्ता भारतामध्ये जखडली असतांनाच लोक
मातृभुमीच्या मुक्ततेसाठी संघर्ष करीत होते. खान्देशवासीय लोक स्वातंत्र्याच्या
विचाराने भारावलेले होते. तसेच शेंदुर्णी हे गांव इतिहासाच्या दृष्टिकोनातुन
क्रांतीमय गांव म्हणुन ओळखले जाते. शेंदुर्णी आणि मराठवाड्याचे नाते सोन नदीच्या
रूपाने जुळल.
खान्देशातील माणसांच्या मनात स्वातंत्र्याच्या विचाराची ज्योत पेटलेली होती. १९४२ च्या चलेजाव आंदोलनामध्ये या परिसरातल्या लोकांनी सहभाग घेतला. म्हणुन ब्रिटाशांनी या गावाचा सामुदायिक दंड केला. क्रांतीकारकांनी ब्रिटीश सरकार कडून हा घेतलेला कर परत मिळविला. सामुहिक दंडाच्या रकमेचा विनीयोग सार्वजनिक कामासाठी व्हावा. म्हणुन सन १७ जुलै १९४४ मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. पहिली शाखा न्यू इंग्लिश स्कूल चा आठवीचा वर्ग सुरु करण्यात आली व संस्थेचे बिज रोवण्यात आले. संस्थापक चेअरमन म्हणून श्रीयुत किसन माधवराव अग्रवाल यांची निवड करण्यात आली. संस्था स्थापनेपासून उदात्त विचारसरणी घेऊन शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या आद्यक्रांतीकारकांनी संस्थेचा गाडा सातत्याने पुढे रेटत ठेवला. या काळात शिक्षण फारसे प्रगत नव्हते. शिक्षणाची द्वारे फक्त प्रस्थापितांसाठी खुली होती. दिन-दलीत व बहुजन समाज शैक्षणिक प्रवाहापासून बाजुला होता. अशा या परिस्थीत या दिन-दलीत व मागासर्गीय बहुजन समाजाला शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत म्हणून या संस्थेने आपल्या शाखा ग्रामीण भागात व परिसरात काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. संस्था उदयाला आल्यापासून थोरामोठ्याचे सहकार्य व त्यांचे विचार या संस्थेला लाभलेत. त्यामध्ये सहकार महर्षी कै. रघुनाथराव भाऊराव गरुड , श्री राजमल लखीचंद शेठ, काकासाहेब साने यांनी या संस्थेचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अर्थात ही शिक्षण संस्था समाजामध्ये परिवर्तनाचा विचार घेऊन निघालेली होती. केवळ एका विशिष्ट समाजापुरता वा धर्मापुरता मर्यादीत न राहता सर्वांसाठी खुले शिक्षण हा उदात्त विचार त्यांच्या जवळ होता. या शिक्षण संस्थेमध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना स्थान होते. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या संस्थेचा शैक्षणिक विकास सुरू झालेला होता. या संस्थेच्या विकासाचा खरा केंद्रबिंदु व आधार स्तंभ म्हणजे. महाराष्ट्राचे विधानसभेचे भुतपुर्व उपाध्यक्ष कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड हे होय. अतिशय सुजाग्र व्यक्तीमत्व अफाट बुद्धीमत्ता, सरस्वतीचे उपासक, बहुभाषीक जगदंबेचे उपासक, विद्वतेचे पुजारीच दुरदृष्टीकोन असणारा असा हा माणुस गरीबीची सदैव जाणीव ठेवून दिनदलीताच्या बद्दल विचार बाळगणारा अशा या बापूसाहेबांनी दिनदुबळ्यांच्यासाठी आपले जीवन वाहुन घेतले समाजातील गरीब होतकरू आणि दिनदुबळ्या मानवाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून त्यांना त्यांचा उत्कर्ष साधता येईल. यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. बापूसाहेब गजाननराव गरूड केवळ खान्देशाला सुपरीचीत नाहीत तर साऱ्या महाराष्ट्राला त्यांची ख्याती आहे. स्वतः सत्तेमध्ये सहभागी न होता. संस्थेमध्ये इतरांना संधी देवून स्व:ता पदाविना संस्थेची घुरा सांभाळली राजकीय सत्ता नसतांना विरोधात राहुन ग्रामिण भागाचा विकास झालेला नसतांना दळणवळणाचे साधन उपलब्ध नसतांना अत्यंत खडतर मार्ग समोर असतांनाही ग्रामीण परिसरामध्ये संस्थेच्या उपशाखा निर्माण करण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केलेत. डोंगरदऱ्या व माळरानामध्ये ग्रामीण भागातील लोकांपर्यंत शिक्षणाची कावड घेऊन ते पोहचले. केवळ शिक्षणाच्या सोयी उपलब्ध न करता विद्या दानाबरोबर अन्नदानाचे पवित्र काम त्यांनी करण्याचे ठरविले. दिनदुबळ्या व मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह काढलीत पुरोगामी विचार बरोबर घेऊन फुले, आंबडेकरांच्या विचारांने भारावलेल्या या माणसाने या शैक्षणिक संस्थेसाठी आपले आयुष्य वेचले.
सन १९५७ चा काळ,
मुंबई
सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेलेला या
पार्श्वभूमीवर के. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांच्या रूपाने तरूण व तडफदार
झुंझार नेतृत्व उदयास आले. १९५७ साली जामनेर तालुक्याचे आमदार म्हणून बापू भरघोस
मतांनी निवडून आले. शेंदुर्णी गावाच्या व शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या इतिहासात
सुवर्ण अक्षरांनी नमूद करण्यासारखा दिवस, शेंदुर्णी ग्राम पंचायत महाराष्ट्र
विधानसभा सांभाळत असतांनाच शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे नेतृत्व त्यांच्याकडे आले,
शिक्षणाची
दूरदृष्टी असणारे बापूंना हे माहीत होते
की, शिक्षणाची ही गंगोत्री खेड्यापाड्यापर्यंत पोहचली तरच ह्या भागाचा
कायापालट होईल म्हणून सुरूवातीपासून त्यांनी विविध खेड्यांना भेटी देवून शाळा व वस्तीगृह
काढावयाचा सपाटा सुरू केला व अतिशय थोड्या कालावधीत बापूंनी आपल्या खडतर
तपश्चर्येने ज्ञानाच्या पांरब्या शेंदुर्णी व्यतिरिक्त लोहारे, वरखेडी,
तारखेडा,
वडगांव,
पाळधी,
गणपूर,
वाकोद
इत्यादी ठिकाणी शाळा व वस्तीगृह काढून रूजवल्या. ज्ञान पंढरीच्या या वारकऱ्याचे
समाधान होत नव्हते. म्हणून वडगांव ता. भडगांव पळासखेडा (मिराचे), वाकोद,
गणपुर,
मंगरूळ,
ता
चोपडा या ग्रामीण ठिकाणी शाळा व वसतिगृहे सुरू करून जामनेर तालुकाच नव्हे तर
संपूर्ण जळगांव जिल्ह्यात ज्ञान दान व अन्नदानाचे पवित्र कार्य प्रत्येकाच्या
घरापर्यंत बापूंनी पोहचविले. त्यांच्याच पाऊलावर पऊल ठेऊन दादासो.श्री संजय गरुड
यांनी विटनेर येथे माध्यमिक विद्यालय सुरु केले. खेड्यातील मुलींच्या शिक्षणाची
मोठी बिकट समस्या होती. इ. १० वी पर्यंतचे शिक्षण या माध्यमिक विद्यालयातून मिळू
शकत होते. परंतू उच्च शिक्षणापासून त्यांना वंचीत रहावे अगत असे म्हणून शेंदुर्णी
व लोहारा या ठिकाणी उच्च माध्यमिक
विद्यालयाची स्थापना केली. काही काळांनंतर लोहारा येथील उच्च माध्यमिक विद्यालय
बंद झाले आणि वाकोद या ठिकाणी कनिष्ठ
महाविद्यालय स्थापना करण्यात आली. त्यात
कला, वाणिज्य व विज्ञान या शाखाबरोबरच शेंदुर्णी येथे कला, वाणिज्य महाविद्यालय व
होमियोपथी मेडिकल महाविद्यालयाची स्थापना केली. या कॉलेजातून बाहेर पडलेल्या
डॉक्टरांच्या दोन-तीन पिढ्या आज शेंदुर्णीत व इतरत्र यशस्वी डॉक्टर म्हणून नाव
कमावीत आहेत. शाळा वसतिगृह याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन स्वस्त धान्य
दुकान, स्वस्त सहकारी कापड दुकाने सुरू केले.
इवलेसे
रोप लावीयले दारी। त्यांचा वेलू गेला गगनावरी ||
ज्ञानदेवांच्या या उक्तीप्रमाणे 'धी.
शेंदुर्णी.एज्यू. सोसा'. या संस्थेच्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष
झाला आहे. १५ माध्यमिक विद्यालये, २ कनिष्ठ महाविद्यालये, १
कला वाणिज्य महाविद्यालय, १५ वसतिगृहे, ५ स्वस्त धान्य दुकाने, १
किमान कौशल्यावर आधारित कनिष्ठ महाविद्यालय व १९९५ - ९६ पासून विज्ञान
महाविद्यालयाची सुरूवात करून संस्थेने ग्रामिण भागात मोठं शैक्षणिक असे कार्य
उभारले. आहे.१५,००० हुन जास्त विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यात ७,०००
हून अधिक मुलींची संख्या आहे १५ मागास वर्गीयांचे वसतिगृहातून ७०० हून अधिक
विद्यार्थी शैक्षणिक सोयी सवलतीचा लाभ घेत आहेत. या वसतिगृहाचे वैशिष्ट्ये म्हणजे
कोणत्याही विद्यार्थ्याकडून कसल्याही स्वरूपाची देणगी स्वीकारली जात नाही त्यात संस्थेचा सिंहाचा वाटा असतो. त्यात अल्प मुदत
असो की मुदत ठेव असो, संस्था नेहमी आघाडीवर असते. प्रत्येक शाळेच्या सुसज्ज इमारती,
भव्य
पटांगण, सर्व सुख सोयीनी उपलब्ध अशा प्रयोग शाळा प्रत्येक विद्यालयाच्या
सभोवताली जोपासलेली वृक्ष संपदा, शास्त्रीय प्रयोगाच्या दृष्टिने असलेला
बगीचा, स्काऊट गाईड, समाजसेवा, एन. सी. सी. इ. ची शिस्त बद्ध पथके आणि
अनुभवी प्रशिक्षीत व विनम्र असा शिक्षक वर्ग आहे.
७९ वर्षांच्या
कालावधीत अनेक चढउताराचे प्रसंग संस्थेच्या इतिहासात येऊन गेलेत. परंतु कुठल्याही
प्रसंगाला न डगमगता धैर्याने तोंड देवून संस्था उज्ज्वल परंपरेकडे व यशाच्या
शिखराकडे सतत वाटचाल करीत आहे. जसे वाईट प्रसंग आलेत तसेच अनंत आनंदाचे देखील क्षण
आलेत. संस्थेच्या मानाच्या तुऱ्यात भर घालणारे कवीवर्य पद्भूषण श्री. ना. धो
महानोर, महाराष्ट्र राज्याचे विधान भवनाचे निर्मिती करणारे श्री पी. डी. वाणी
मराठवाड्यातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने अनेकांची
मने जिंकलीत. शाळेतून आजपर्यन्त शिकलेल्या विद्यार्थ्यातून प्राचार्य डॉ. भगवानराव
देशमुख हे व अशा अनेक वकिल, डॉक्टर्स, इंजीनियर्स,
प्रशासकीय सेवा, प्राचार्य-प्राध्यापक, सी.ए. राजकीय सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी या संस्थेत शिक्षण घेऊन स्वतःचे व
संस्थेचा नावलौकिक केला. अनेक विद्यार्थ्यांनी तर परदेश दौराही केले
आहेत. याचा संस्थेला रास्त अभिमान वाटतो. बापू
नेहमी म्हणायचे Education is soul of Life. संस्थेचे
विद्यमान चेअरमन दादासो. श्री संजय भास्करराव गरुड आणि संस्थेचे सचिव दाजीसो. श्री.
सतीश चंद्र काशिद यांच्या कुशल
मार्गदर्शनाखाली प्राचार्य, मुख्याध्यापक कर्मचारी वर्ग अतिशय
जिद्दीने काम करीत आहे.
संस्था आणि
बापूसाहेब यांचे अतूट नाते जणू संस्था म्हणजे बापू आणि बापूसाहेब म्हणजेच संस्था.
बापूना अंतिम
काळात किडनी, मधुमेह इ. विकार सतावू लागले होते. पण त्याकडे तेवढ्यापुरते लक्ष
देवून सर्वत्र धावपळ चालू होती. आणि अखेर २० डिसेंबर १९८४ रोजी हा कर्तृत्वसूर्य
अस्तास गेला. धगधगते जीवन शांत झाले बापूंच्या जाण्याने शेंदुर्णी व जळगांव
जिल्ह्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते गेले तरी त्यांचे शैक्षणिक
क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. आठवणी तर चिंरतर आहे. त्या स्मृतींना सादर प्रणाम.
मुळ रोपट्याच्या
आज मोठा वटवृक्ष झाला आहे. हा वटवृक्ष जोपासण्याचा, वाढविण्याचा या परिसरातील अनेक
कार्यकत्यांनी प्रयत्न केला आहे. शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचा प्रगतीचा आलेख जो
वाढत गेला त्यापाठीमागे बापूसाहेब गरुडाचे प्रयत्न आहेत. आजही या संस्थेची
प्रगतीची वाटचाल सुरु आहे. ती बापूसाहेब गरूडांनी घालून दिलेल्या विचारतूनच संस्थेच्या
वाटचाल सुरू आहे. संस्थेला जवळपास आज ७९ वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या ७९ वर्षाच्या
काळात अनेक चढउतार या संस्थेमध्ये आलेत. परंतु एकतेचा विचार मात्र या
कार्यकर्त्यांनी सोडला नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा जो
वारसा बापूसाहेबांनी घालून दिलेला आहे. तोच वारसा अद्यावत सुरू आहे. संस्था
शासनाच्या नियमाच पुरेपुर काटेकोर पालन करत असुन वेळोवेळी शासन निर्णयाच्या अधीन
राहुन आपली वाटचाल करीत आहे. कै. बापूसाहेब गजाननराव गरूड यांच्या निधनानंतर
त्यांचे थोरले बंधु आण्णासाहेब भास्करराव गरूड या संस्थेची धुरा सांभाळत होते. त्यानंतर
दादासो.श्री. संजय भास्करराव गरुड आणि qभाऊसो. श्री.दीपक
काशिनाथ गरुड हे आपल्या सहकाऱ्यांसह या संस्थेची प्रगती करीत
आहे. संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण करण्याचे अवचित्य साधून संस्थेचे संस्थापक,
सहकार महर्षी कै. आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे
अनावरण झाले. बापूंनी खडकावर लावलेलल्या या अंकुराचे रुपांतर आता वट
वृक्षात झाले आहेत हे असेच वृद्धिंगत
व्हावे. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेछा..
Super 👍
ReplyDeleteVery nice article. Very good collection of all the information of The Shendurni Education Society. 🌹🌹👌
ReplyDeleteखूपच सेवाभावी शैक्षणिक संस्था आहे. माझे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे याच संस्थेत झाले आहे.
ReplyDeleteअन्यथा मी शिकलो नसतो. माझ्यासारख्या अनेक गरीब, गरजू, आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संस्थेत शिकता आले.
याचे सारे श्रेय बापूंना जाते.
मी संस्थेचा, बापूंचा अत्यंत ऋणी आहे.
संस्थेच्या साऱ्या कार्याला ...शुभेच्छा