सारे जहाँ से अच्छा...

 *सारे जहाँ से अच्छा...*


आपल्या साऱ्यांचे हे भाग्य आहे की, या भारतभूमीत आपला जन्म झाला. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आदी नद्यांच्या जलाने पावन झालेला हा प्रदेश हिमालयाचा रुपेरी मुकुट या भारतमातेने परिधान केला आहे. सागर तिच्या पायाला स्पर्श करतो आहे. कन्याकुमारी येथे तिन्ही सागरांचं जल एकमेकांत मिसळलेले आपणास दिसतं. त्या समुद्रात जो खडक आहे. ज्यावर स्वामी विवेकानंद बसले होते, त्या खडकावर सागराच्या लाटा सतत येऊन अभिषेक करीत असतात. जणू सागराचीही देशभक्ती उचंबळून येते आणि लाटांच्या रूपात तो भारतमातेला जलाभिषेक करतो. तिथूनच स्वामी विवेकानंदांना प्रेरणा मिळाली. आपलं जीवनध्येय गवसलं. सागराची हाक आणि रामकृष्ण कापरमहंसांचे आशीर्वाद यांचा संगम झाला आणि नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदांत झालं. भारतीय संस्कृती जगाला कळली, ती स्वामी विवेकानंदांच्या रूपाने. याच विवेकानंदांनी 'देश हाच आपला देव आहे. त्याचीच पूजा करा असा प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला.


इंग्लंडमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हृदय मातृभूमीच्या आठवणीनं उचंबळून आलं. सागराच्या सान्निध्यात बसले असताना त्यांच्या ओठी शब्द आले, 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला... हे देशप्रेम! जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा देशासाठी तुरुंगात अपार कष्ट, यातना सहन केल्या.  चाफेकरांना जेव्हा इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली, तेव्हा सावरकर म्हणाले, "स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन चाफेकर फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाता-जाता चेतविलेली शत्रुजयवृत्ती, महाकुंडात समिधेमागून समिधा टाकून अशीच भडकावीत नेणं असेल, तर त्याचं दायित्व आपल्यावर आहे. देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मारता मरेतो झुंजेन." चाफेकरांनी जेव्हा देशासाठी बलिदान दिलं, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पोवाडा लिहिला. त्याने तरुणांना त्या काळात अतिशय स्फूर्ती दिली.

स्वजनछळाते ऐकुनी होती तप्त तरुण जे अरुण जणो देशासाठी प्राण देती धन्य धन्य त्या का न म्हणो

शतावधी ते जन्मा येती मरोनी जाती ना गणती देशासाठी मरती त्यासी देशपिते की बुध म्हणती.'

अशा अनेक क्रांतिवीरांचं, देशभक्तांचं देशाच्या स्वातंत्र्ययज्ञात बलिदान पडलं. म्हणून तर सिद्धहस्त कवी ग. दि. माडगूळकर लिहून गेले, 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम् अनेक क्रांतिकारक 'वंदे मातरम् म्हणत हसत-हसत फासावर चढले. कुसुमाग्रजांचं 'गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार हे गीत अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं. देशभक्तीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. हा सुगंध देता देता स्वातंत्र्ययज्ञरूपी कुंडात अनेकांच्या प्राणांची आहुती पडली, या आहुतीने यज्ञदेवता प्रसन्न झाली. या देवतेने प्रकट होऊन 'स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हाती दिला. दीर्घकाळाच्या परकीय सत्तेनंतर भारत स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य आम्हाला सुखासुखी मिळालं नाही, याचं भान आम्ही ठेवणं आवश्यक आहे.

३ एप्रिल १९८४. भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा अवकाशात होता. त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. इंदिरा गांधी तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी राकेश शर्माला विचारलं, 'आपको अंतराल से हमारा भारत देश कैसा दिखाई दे रहा है? राकेश शर्माने तत्काळ फार सुंदर उत्तर दिलं. 'सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. किती सुंदर आणि मन भरून यावं असं हे उत्तर!

असा हा 'सारे जहाँ से अच्छा असलेला आमचा देश आज प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे. स्वातंत्र्यासाठी सारे देशभक्त, क्रांतिकारक एक होऊन लढले. जातिधर्माची पर्वा न करता. 'अवघा रंग एक झाला. पण आज त्याच देशाला जातिपातीने, धर्मभेदाने, भाषाभेदाने विभागलं गेलं आहे. संतांची, महापुरुषांची, नेत्यांची जातीपातींत वाटणी झाली आहे. क्षुल्लक कारणांवरून दंगली पेटत आहेत. लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. जाळपोळ, लुटालूट, अन्याय, अत्याचार होत आहेत. आपल्या सगळ्या देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी याचसाठी अट्टाहास केला होता का? 'हेचि फळ काय मम तपाला' असं तर त्यांचे आत्मे म्हणत नसतील? म्हणूनच देशभक्ती म्हणजे फक्त १५ ऑगस्टला किंवा २६ जानेवारीला ध्वजवंदन करणं नव्हे. वर्षभर असं वागलं पाहिजे की, आपण जी जी कृती करू, ती देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असली पाहिजे. कोणतीही कृती करताना, निर्णय घेताना ही कृती माझ्या देशाच्या दृष्टीने हिताची आहे ना, याचा विचार केला पाहिजे. या देशाचा धर्म एकच. तो म्हणजे राष्ट्रधर्म! आणि तोच आपल्या सगळ्यांचा धर्म असला पाहिजे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावर लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांचं गीत गायलं. ते गीत ऐकून पं नेहरूंच्या डोळ्यांतही अश्रू आले. आज त्याच गीताची आठवण करून लेखाचा शेवट करू या.

 *ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भरलो पानी जो शहीद हुऐ है उनकी जरा याद करो कुर्बानी.' जयहिंद.*

Comments

Popular posts from this blog

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा