ये राखी बंधन हैं ऐसा...



ये राखी बंधन हैं ऐसा...

मंडळी, सध्या online चा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट online मागवता येते. आज नवीन वाटणाऱ्या गोष्टी उद्या जुन्या होतात. पण काही गोष्टी या चिरंतन टिकून राहतील त्यातीलच एक म्हणजे रक्षाबंधनाची परंपरा. अगदी बारीकसारीक गोष्टीही ऑनलाईन मागवणारी मंडळी आहेत. तशीच ते राखीही ऑनलाईन मागवू शकतील. पण त्यामागील बहिणीचे प्रेम नाही मागवता येणार. ‘ ये राखी बंधन है ऐसा...’ राखी म्हणजे तसा दिसायला एक रेशमी धागा. पण त्यामागची भावना किती श्रेष्ठ ! राखी म्हणजे रक्षण. राखीचा पवित्र धागा अशा काही बंधनात बांधतो की हे बंधन दिसत नाही. राखी भलेही तुटेल पण त्यामागची भावना, प्रेम अबाधित राहते. एक अदृश्य बंधन भावाबहिणींना बांधून ठेवते.


     वर्षाच्या ३६५ दिवसातले ३६३ दिवस तुमचे पण दोन दिवस बहिणीचे. एक राखी पौर्णिमा आणि दुसरा भाऊबीज. भाऊ आणि बहिण यांचे नाते सगळ्या सीमारेषा पार करून जाते. जाती, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांना ओलांडून ते जाणारे आहे. विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा हा सण आहे. बहिण आपल्या संसारात रमलेली असते. तिचे एक नवीन विश्व तयार झालेले असते. त्या विश्वात ती वर्षभर गर्क असते. मुलेबाळे, संसार, नातेवाईक आदी साऱ्या साऱ्या जबाबदाऱ्या निभावत असते. पण रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी तिचे डोळे लागलेले असतात फक्त आपल्या भावाकडे. तो कधी येतो, आपण त्याला कधी ओवाळतो आणि राखी बांधतो, त्याला मिठाईचा घास भरवतो असे तिला होते. त्या दिवशी तिला दुसरे काही नको असते. वर्षभरातून भावाने एकदा तरी आपल्यासाठी एकदा तरी वेळ काढावा एवढीच तिची माफक अपेक्षा असते. परक्या घरी आल्याने आईवडील तिला तसे दुरावलेले असतात. भावाने आपल्या आईवडिलांची नीट काळजी घ्यावी. त्यांना काही कमी पडू देऊ नये असे तिला वाटत असते. आणि संकटकाळी, सुखदु:खाच्या प्रसंगी भावाने आपल्या मदतीसाठी धावून यावे. आपले रक्षण करावे असेही तिला वाटत असते.


     स्वामी विवेकानंदांनी जेव्हा शिकागोच्या धर्मपरिषदेत पहिल्यांदाच सगळ्यांना ‘ My brothers and sisters of America  ‘ असे आवाहन केले तेव्हा भारतासकट सगळ्या जगातील स्त्रिया या भगिनी झाल्या आणि सगळी माणसे बंधू..! केवढी विशालता...! केवढा मनाचा मोठेपणा...! आपणही आता शाळेतील विद्यार्थ्यांना जेव्हा प्रतिज्ञा शिकवतो तेव्हा म्हणतो, ‘ भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. ‘ पण प्रतिज्ञा म्हणणे हा बऱ्याच वेळा एक उपचार फक्त होतो. त्यातील अर्थ बाजूलाच राहतो. अनेक वक्ते आपल्या भाषणाची सुरुवात ‘ बंधू आणि भगिनींनो ...’ असे आवाहन करून करतात. नेतेही करतात. पण या गोष्टी बोलण्यापुरत्याच राहतात. कारण तसे असते तर आज जी जाती, धर्म, प्रदेश, भाषा इ. वरून भांडणे सुरु आहेत ती दिसली नसती. बोलायला आम्ही खूप मोठ्या गोष्टी बोलतो. पण त्या बोलण्याला, त्या शब्दांना जोपर्यंत आचरणाची जोड दिली जात नाही तोपर्यंत ते बोल म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे ठरतात ! 


     नुकताच आपण मैत्री दिन साजरा केला. मैत्री दिनाचे कितीतरी संदेश आपल्या त्या छोट्याशा हातात मावणाऱ्या भ्रमणध्वनीवर आले. ‘ जणू काही करलो दुनिया मुठ्ठी में..’ पण हे संदेश आणि आज येणारे happy rakshabandhan चे शेकडो संदेश आपल्याला येतील. पण जोपर्यंत आपण ते खऱ्या अर्थाने मनापासून पाळत नाही तोपर्यंत ते केवळ औपचारिकता ठरतात. आजच्या काळात राखी पौर्णिमा खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली आहे. विश्वव्यापक झाली आहे. काही वर्षांपूर्वी भारतातून काही राख्या अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही पाठवण्यात आल्याचे मी वाचले होते. आता डोनाल्डभाऊंना राखी पौर्णिमेची परंपरा माहित असण्याचे काही कारण नाही. ते त्यांना कोणीतरी समजून सांगावे लागेल तरच राखी म्हणजे काय, हे त्यांना कळेल. 


जसे सिकंदराला सावित्रीने राखीचे महत्त्व सांगितले होते. नाही माहिती ? सिकंदर उर्फ अलेक्झांडर द ग्रेट भारत जिंकण्यासाठी आला, झेलम नदीपर्यंतचा प्रदेश त्याने जिंकला. त्यावेळी झेलम नदीच्या काठी एक स्त्री नदीचे पूजन करून नदीला राखी अर्पण करीत असल्याचे त्याने पाहिले. आणि त्या स्त्रीला मग त्याने त्यामागील कारण विचारले. तेव्हा त्या स्त्रीने राखीच्या पवित्र धाग्यामागील इतिहास आणि परंपरा सिकंदराला कथन केली. आणि मग सिकंदराने त्या माहितीने प्रभावित होऊन त्या स्त्रीकडून राखी बांधून घेतली. तो तिचा मानलेला भाऊ झाला. पण त्याने आपले वाचन पाळले, भावाचे नाते निभावले. ती स्त्री होती सावित्री. पुरू किंवा पौरस राजाची बहिण. जेव्हा सिकंदराने पुरुचे राज्य जिंकले आणि पुरूला बंदिवान केले तेव्हा सावित्रीने सिकंदराला पुरू हा आपला भाऊ असल्याचे सांगितले आणि मग सिकंदराने आपले भावाचे नाते स्मरून पुरूला तर सोडलेच पण त्याचे राज्यही परत केले.

     अशीच राखी चितोडची राणी कर्मावती हिने हुमायून बादशाहाला बांधली होती. पुढे हुमायुनाने चितोडचे भावाच्या नात्याने रक्षण केले. तशा राखीच्या संदर्भात खूप आख्यायिका आहेत. पण त्या सगळ्याच येथे सांगत नाही. आवश्यकताही नाही. या सणाला नारळी पौर्णिमेचा सुद्धा संदर्भ आहे. पावसाचा जोर कमी होऊ लागतो. वादळ वारे कमी होऊ लागतात. ज्यांचे जीवन समुद्रावर अवलंबून आहे असे कोळी बांधव आजच्या दिवशी समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात.

द्रौपदी ही श्रीकृष्णाची बहीण होती, सखी होती. एकदा श्रीकृष्णाच्या करंगळीतून लागलेली रक्ताची धार काही केल्या थांबत नव्हती. कदाचित ती परमेश्वराची लीला असावी, आपल्या भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी. पण अशा वेळी द्रौपदीने आपला भरजरी शालू फाडून त्याची बोटभर चिंधी हरीच्या बोटाला बांधली. श्रीकृष्णाचे वाहणारे रक्त थांबले. पण याच बोटभर चिंधीच्या भक्तिभावाने हरीला किती बांधून ठेवले ! द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी जेव्हा इतर कोणी मदतीला धावून आले नाही, तेव्हा याच हरीने वस्त्रे पुरवून आपल्या भगिनीचे लज्जारक्षण केले. राखीचा रेशमी धागा तिच्या भावांना अशाच प्रेमाच्या बंधनात बांधत असतो.


     अनेक शाळेतील मुलामुलींनी सीमेवरील सैनिकांना सुद्धा राख्या पाठवल्या आहेत. सैनिक हा सुद्धा भाऊच. तो शत्रूपासून आपले रक्षण करतो. दिवसरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देतो, सीमा सुरक्षित ठेवतो. म्हणून त्यालाही भावाच्या नात्याने राखी. आज कधी नव्हे त्या आपल्या सीमा धोक्यात आल्या आहेत. चीनने तर घुसखोरी केली आहे. युद्धाचे सावट दिसते आहे. पाकिस्तान बद्दल तर काही न बोलणेच बरे. या सीमांसोबत नात्यांच्याही सीमा धोक्यात आल्या आहेत. अनेक भगिनींवर झालेल्या अत्याचाराच्या बातम्या आपण वृत्तपत्रात वाचतो आणि केवळ हळहळ व्यक्त करतो. पण सगळ्या स्त्रियांकडे केवळ एक स्त्री म्हणून न पाहता माता, भगिनी या दृष्टीकोनातून पाहायला हवे हे आजचा दिवस आपल्याला सांगतो. ही आपली भारतीय संस्कृती आहे.आजचा रक्षाबंधनाचा दिवस हा त्या दृष्टीने टाकलेले एक पुढचे पाऊल ठरावे ही अपेक्षा !



Comments

Popular posts from this blog

बाप ओळखता... येत नसतो

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा