शिक्षक


शिक्षक

5 सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचा जन्मदिवस, जो भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या डॉ. राधाकृष्णन ह्यांच्यामुळे शिक्षक दिनाचे महत्व अधोरेखीत झाले ते स्वतः एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. एक सर्वज्ञ, ज्ञानी, प्रकांड पंडित, जवळपास 14 विविध भाषा फक्त अवगतच नव्हत्या तर त्या भाषेंवर प्रभुत्व होते. डॉ. राधाकृष्णन यांनी 1962 साली राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेण्याआधी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे 'उत्कृष्ट शिक्षक' होते. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतात.


शिक्षक हा काही फक्त एक पेशा नाही अथवा उत्पन्नाचे साधन म्हणून स्वीकारलेली नोकरी होऊ शकत नाही. शिक्षक होण्यासाठी त्या पेशाची उपजत आवड हवी. विद्यार्थी आणि शिक्षण ह्यातील तो महत्वाचा दुवा आहे. शिक्षक होण्यासाठी एक तळमळ असावी लागते, कुठल्याही स्तरांवर शिकवण्यासाठी एक शिकवण्याची तळमळ हवी. समोरच्या विद्यार्थ्याला शिकवताना त्याला त्या विषयात पारंगत करण्याच्या ध्यासासोबत एक सुजाण नागरिक बनवण्याची भावना जोपासली जाते.

पूर्वी शिक्षक स्वतःची पदरमोड करत, मुलांना शिकवण्याच्या ध्यासापायी मैलोनमैल चालत शाळेत पोहोचत, किंबहुना कितीही अडचणी असतील तरी शिकवण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नसे आणि त्या ध्यासापोटी ते कसेही करून शाळेत पोहोचत, विद्यार्थ्यांसाठी उशिरापर्यंत थांबत त्यांचा अभ्यास परिपूर्ण करून घेत. त्या ध्यासापोटी विध्यार्थी आणि शिक्षण ह्यांच्यामध्ये एक विलक्षण जिव्हाळ्याचे नाते निर्माण होत असे आणि ते उत्तरोत्तर वृद्धिंगत होत असे.

शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांना फक्त त्या विषयात पारंगत बनवत नाही तर शिकण्याची गोडी निर्माण करतो. आपल्याकडे बर्‍याच जणांना गणित विषयाबद्दल आवड नसते किंबहुना तो किचकट विषय म्हणून टाळला जातो पण शिक्षक अश्या नावडत्या विषयाला अश्या रीतीने हाताळतात की त्या विषयाची रुची निर्माण होते.अश्यावेळी शिक्षक तुम्हाला स्वावलंबी होण्याचे धडे देतातच पण त्या विषयात पुढे वाटचाल करण्यासाठी आत्मनिर्भर बनवतात. ह्या बाबतीत एक सुंदर प्रसिद्ध चिनी वाक्य आहे.

"Give me fish which I eat for a day,

Teach me fishing and I eat for life time."

शिकवणे ही एक कला आहे. समोरच्या विद्यार्थ्यांचे पूर्ण अवलोकन करत त्याची बलस्थाने आणि कच्चे दुवे ह्याचा सहजपणे अभ्यास करत, त्याच्या कच्च्यादुव्यावर मात करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करणे आणि त्याच्या बलस्थानाच वापर करत त्याला अधिकाधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणे हे उत्तम शिक्षकाचे गुण आहेत. विद्यार्थ्यांना त्या विषयातील आवड निर्माण करणे, शिकताना उगाच शिक्षणाचा बाऊ न करता हसतखेळत शिकवण्याचा प्रयत्न करणे हे महत्वाचे उद्दिष्ट ठरते.

" It ia supreme art of teacher to awaken joy in creative expression and knowledge."

-Albert Einstein

प्रत्येक पाल्य, विद्यार्थी एक विशेष व्यक्तिमत असते. प्रत्येक पाल्यामध्ये काही विशेष गुण असतात. ते अंगभूत गुण शिक्षक सहणपणे ओळखतात आणि ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न करत असतात. शिक्षकाच्या योग्य मार्गदर्शनामुळे ह्या अंगभूत गुणांचा विकास होत असतो.

आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक असतो त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांचा अभ्यास करत त्याला प्रोत्साहित करीत त्या विशिष्ट विषयात त्याला पारंगत होण्यासाठी शिक्षकांचा मोठा हातभार असतो, जणू त्या हिऱ्याला वेळीच पैलू पडण्याचे काम शिक्षक करत असतो.

जुन्याकाळी गुरू शिष्य परंपरा होती किंबहुना पालक एक ठराविक वयोगटात आपल्या पाल्याला गुरूंच्या घरी पाठवत असत तेथे त्या पाल्याला शिक्षणासोबत स्वावलंबनाचे धडेही गिरवले जात.त्यामुळे अश्या ठिकाणी शिकताना विद्यार्थी त्या शिक्षकाच्या चरणी जणू लीन होत विद्याभ्यास करत असे.

कालानुरूप शिक्षणाची पद्धत बदलली तरीही आदर्श शिक्षकांनी शिकवण्यातली जिद्द, तळमळ, आस्था तशीच कायम ठेवली.

शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना फक्त कर्तव्य म्हणून शिकवत नसतो तर शिकवताना त्या विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना मिळावी आणि त्याची विचार शक्ती वाढावी ह्या हेतूने शिकवत असतो.

'The best teacher are those who show you where to look but don't tell you what to see.'

शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना फक्त शालेय शिक्षण देत नाही तर सामाजिक मूल्य, नीतिमत्ता, ethics ह्याचाही पाठ देत असतो त्यामुळे तो विद्यार्थी सुशिक्षित होतोच पण सुसंस्कृत आणि सुजाण नागरिकही होतो.

" Intelligence and character that is the goal of the true education."

-Martin Luther King.

कालानुरूप दुर्दैवाने शिक्षण एक नोकरी आणि अर्थार्जनाचे साधन बनले. त्यापायी शिकवणे एक सोपस्कार बनत चालले आहे. ह्याला कारण विद्यार्थ्यांचा शिक्षकांबद्दल कमी होत चाललेला आदरभाव आणि शिकण्याची अनास्था. त्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड, गोडी निर्माण करायला हवी. विद्यार्थ्यांना शिकत असताना शिकण्याच्या प्रक्रियेत जास्तीतजास्त समाविष्ट करून घ्यायला हवे जेणेकरून विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांचे भावबंध सदृढ व्हायला हवे.

"Tell me and I forget.

Teach me and I remember.

Involve me and I learn."

-Benjamin Franklin.

ह्यावरील उक्तीप्रमाणे शिक्षण हे ढोबळमानाने न होता त्यात प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असायला हवा, त्यासाठी नवनवीन project, उपक्रम हाती घ्यायला हवे, विद्यार्थांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकाचा सहभाग असल्यास शिक्षण अधिकाधिक हवेहवेसे आणि व्यवसायभिमुख होईल, ह्यासाठी शिक्षक जागरूक हवा. शिक्षणात फक्त गृहपाठ नसावा तर काही नवीन ज्ञान संपादन केले ह्याचे समाधान हवे.

"True teacher, who gives you something to take home to think about besides homework."

शिक्षण आणि शिक्षण पद्धती ह्यात कालानुरूप बदल होत आहे. शिक्षणात नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. नव्या तंत्रज्ञानाने माहितीची कवाडं उघडी झाली आहेत. त्यामुळेच शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन बदल स्विकारुन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा.

शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञानापूरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना सभोवतालच्या जगात वावरताना नवीन आत्मविश्वास निर्माण करायला हवा.

" The whole purpose if education is to turn mirrors into Windows."

शिक्षकांनी शिकवताना स्वतःला अद्यावत राहणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे योग्य निराकरण आणि समाधान करण्यासाठी शिक्षक अतिशय जागरूक हवेत.

सरते शेवटी उत्तम शिक्षक कोण? तर जो आजन्म विद्यार्थी असतो.त्यामुळेच शिक्षण ही एक नोकरी वा फक्त अर्थार्जनाचे साधन नसून ते स्वतःच्या आवडीने स्वीकारलेले एक सामाजिक व्रत आहे.

असे म्हणतात, शिक्षकाचे वयोमान किती? तर त्या शिक्षकांनी घडवलेले विद्यार्थी जोपर्यंत आहेत तेवढे त्या शिक्षकाचे वयोमान, कारण जो आदर आणि पवित्र स्मृती त्या विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल जिवंत असतात तो आदर खचितच इतर कोणाला मिळत असेल.


Comments

Popular posts from this blog

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा

सारे जहाँ से अच्छा...